भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी पराभूत

 


भाजपच्या शुभेंदू अधिकारींचा 15 हजार मतांनी विजय

कोलकाता, 04 मे (हिं.स.) : तृणमूल काँग्रेससह पश्चिम बंगालच्या निवर्तमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्याच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या शुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा 15 हजार 114 मतांनी पराभव केला आहे.

यापूर्वी 2021 मध्ये शुभेंदू अधिकारींनी ममतांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. त्यानंतर शुभेंदूंकडून झालेला हा त्यांचा दुसरा पराभव आहे.. त्यामुळे हा निकाल राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भवानीपूरमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची लढत होती. मतमोजणीच्या प्रारंभीक फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या, मात्र दुपारनंतर चित्र पूर्णपणे बदलले. शुभेंदु अधिकारी यांनी आधीच दहाव्या फेरीनंतर आघाडी घेण्याचा दावा केला होता, जो अखेर खरा ठरला. तब्बल 18 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शुभेंदु अधिकारी यांना 67,239 मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना 56,245 मते मिळाली. अंतिम टप्प्यात हा फरक वाढून 15,114 वर पोहोचला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भवानीपूरमधील ही विजयगाथा शुभेंदु अधिकारी यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी कामगिरी आहे. यापूर्वी 2021 मध्ये नंदीग्राममध्येही त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. या निकालामुळे दक्षिण कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे.

विजयानंतर शुभेंदु अधिकारी यांनी हा विजय “बंगालची अस्मिता आणि सुशासनाचा विजय” असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात झालेला पराभव तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

---------------------

हिन्दुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी